प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाचे मेकओव्हर सुरू आहे. त्याच माध्यमातून नेरळ स्थानकात फलाट दोनवर नव्याने निवारा शेड उभारण्याचे काम सुरू झाले आहे. फलाट दोनवर उपनगरी लोकलचे जेमतेम तीन-चार डब्बे यांच्या भागात उभ्या असलेल्या प्रवाशांना निवारा शेडचा लाभ मिळत होता. त्यामुळे फलाट दोन वरील उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून निवारा शेड बांधण्याची अनेक वर्षापासूनची मागणी होती. या ठिकाणी आता निवारा शेड उभारण्याचे काम वेगाने सुरू असून लवकरच नेरळ स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निवारा शेडचा फायदा मिळणार आहे.
नेरळ रेल्वे स्थानकात फलाट दोनवरील प्रवासी यांच्याकडून सातत्याने निवारा शेड उभारण्याची मागणी केली जात होती. नेरळ स्थानकाची निर्मिती झाल्यापासून अगदी ब्रिटिश काळापासून नेरळ स्थानकात उपनगरीय लोकलचे जेमतेम तीन-चार डब्बे उभे राहतील एवढेच निवारा शेड होते. त्यात फलाट दोनवरील प्रवासी निवारा शेड हे ब्रिटिश काळातील हेरिटेज प्रॉपर्टी असल्याने मध्य रेल्वे प्रशासन यांच्याकडून ठोस असा कोणताही निर्णय घेतला जात नव्हता. त्याचवेळी हेरिटेज शेड हे तोडण्यास हरकत घेतली जात असल्याने शेवटी मध्य रेल्वेकडून निवारा शेड उपलब्ध करून देण्यावर बंधने येत होती. त्यामुळे प्रवासी वर्गाला उन्हा-पावसात निवारा शेड शिवाय राहण्याची वेळ यायची. त्यामुळे नेरळ स्थानकात ज्या-ज्या वेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक किंवा स्थानिक खासदार यांच्या भेटी होत; त्या-त्या वेळी स्थानिक कार्यकर्ते नेरळ प्रवासी संघटना यांच्याकडून फलाट दोनवरील निवारा शेडबद्दल विषय येत होता.
मात्र, नेरळ स्थानकाच्या मेकओव्हरमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून फलाट एकमधील विकासकामे पूर्ण झाल्यावर फलाट दोनवरील विकासकामे मार्गी लावली जातील, असे जाहीर करण्यात आले होते. आता खऱ्या अर्थाने नेरळ स्थानकात फलाट एकवर प्रवासी निवारा शेड उभारण्याच्या कामाला मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून गती देण्यात आली आहे. सध्या करीत दिशेकडून फलाट दोनवर निवारा शेड बघण्याचे कामासाठी पिलर उभे करणे, त्यावर लोखंडी बॅरिकेट्स बसवण्याचे कामे सुरू आहेत. नेरळ स्थानकात आता फलाट दोन वर सुद्धा प्रवासी निवारा शेड उभे राहत असल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.







