| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात पाली तर्फे कोतवाल खलाटी आणि साई डोंगर येथे टोरंट या खासगी कंपनीकडून जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. येथील शेतकऱ्यांनी प्रकल्प उभारण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही आणि असे असताना आदिवासी लोकांच्या जमिनीमध्ये घुसून मातीपरीक्षण तसेच तेथे तंबू उभारून सुरू असलेली कामे तत्काळ थांबवावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने करण्यात आली. टोरंट कंपनी व्यवस्थापन यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून, सुरू असलेली कामे थांबवली नाही तर जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.
टोरंट एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून कर्जत तालुक्यात जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प ज्या जमिनीवर होणार आहे. त्या जमिनीवर आदिवासी लोकांची पूर्वापार वस्ती आहे. येथील वन जमिनीमधील दळी भूखंड शासनाने वन हक्क कायद्याच्या अंतर्गत आदिवासी लोकांना कायमस्वरूपी दिले आहेत. त्यामुळे वन जमिनीचे दळी भूखंडाचे हे आदिवासी वहिवाटदार मूळ मालक बनले आहेत. त्याच जमिनीमध्ये माती परीक्षण, दगड परीक्षण अशी कामे टोरंट कंपनी कडून सुरू आहेत. त्या जमिनीमध्ये आदिवासी लोकांशिवाय आणि आदिवासी लोकांच्या संमती शिवाय काहीही होऊ शकत नाही. असे असताना टोरंट कंपनी आपला प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. टोरंटकडून तेथे आदिवासी जमिनीमध्ये आदिवासी लोकांच्या कोणत्याही परवानगी विना सुरू असलेली कामे तत्काळ थांबवावीत यासाठी येथील आदिवासी लोकांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदने दिले आहे. त्यानंतर देखील टोरंट कडून आदिवासी लोकांच्या जमिनीमध्ये काढता पाय घेतला नाही. त्यामुळे आज शिवसेना ठाकरे पक्षाकडून टोरंट एनर्जी कंपनीला निवेदन देण्यात आले. त्यात आदिवासी जमिनीमध्ये करण्यात आलेली बेकायदा घुसखोरी लक्षात घेता तत्काळ ती जागा सोडून बाहेर पडावे. तसेच तेथे ठेवण्यात आलेल्या मशिनरी तत्काळ उचलण्यात याव्यात अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर जनआंदोलन उभे करण्याचा इशारा ठाकरे पक्षाकडून देण्यात आला आहे.
टोरंट जलविद्युत प्रकल्पाचे काम बंद करावे
