विहूर पुलाच्या खचलेल्या रस्त्याचे काम अपूर्ण

अलिबागकडे जाण्या-येण्यास वाहनांची कोंडी
मुरुडकरांचा असह्य कोंडमारा
मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मागील मुसळधार पावसाने मुरूड ते अलिबागकडे जाणार्‍या मुरूड तालुक्यातील विहूर गावानजीक असलेल्या राज्य मार्गावरील पुलाला जोडणारा रस्ता खचल्याने येथून जेमतेम एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असले तरी म्हणावा तसा वेग नाही. रविवारी दुपारी येथे भेट दिली असता काम बंद असल्याचे दिसून आले.
हा मार्ग अतिशय वर्दळीचा असून असंख्य मुंबई, अलिबाग, रोह्याकडे जाणारी वाहने जात सातत्याने जात असतात. एकेरी जेमतेम एखादे चार चाकी वाहन येथून पास होत असताना पलीकडे सर्व वाहनांना सदर वाहन पास होइपर्यंत थांबावे लागते. दोन-तीन वाहने पास होणार असल्यास 10 मिनिटे अन्य अलीकडील वाहनांना थांबण्याशिवाय पर्याय राहात नाही. प्रचंड कोंडी होते. प्रथम वाहन कोण टाकणार या वरून प्रकरण हमरीतुमरीवर येते.रोजचा हा मनस्ताप असून असंख्य वाहन चालक, एसटी चालक, चार चाकी आणि दुचाकीस्वारदेखील त्रस्त झाले आहेत.
कोरोनामुळे प्रसिध्द मुरूड पर्यटन केंद्राचे आर्थिक नियोजन ठप्प आहे. आता कुठे हळूहळू पर्यटक येऊ लागले आहेत. त्यासाठी आरोग्य, रस्ते सुसज्ज असायला हवेत; परंतु नियोजनात मोठा दोष मुरुडकरांनी अनुभवला. विकास कामाऐवजी आगामी निवडणुकीचे वेध आणि त्यावर चर्चाच आधिक होताना दिसून येत आहे.

Exit mobile version