| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 24 शिबीरे घेतली जातात. त्याचाच एक भाग म्हणजे व्यक्तीमत्व विकास शिबीर हा आहे. या शिबिराच्या माध्यमातून स्वतःची बौद्धीक प्रगती साधण्याबरोबरच व्यक्तीमत्व विकास वाढीला देखील चालना मिळते. त्यामुळे बौद्धीक क्षमता वाढविण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. प्रत्येकाने वाचन करून स्वतःची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. विवेक बुद्धी जागृत ठेवून काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड यांनी केले. दरम्यान, जिल्हा शाखेच्या कार्याचे कौतूकही त्यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा (उत्तर) आयोजित मोहपाडा येथे रविवारी (दि.22) व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण सभासद नोंदणी मोहिम उद्घाटन आणि जनगणना 2026 मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲड. एस.एस. वानखेडे, जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे, सरचिटणीस प्रकाश सोनावळे, कोषाध्यक्ष राजेंद्र बावस्कर, संस्कार उपाध्यक्ष संतोष जाधव आदी मान्यवरांसह जिल्हा, तालुका शाखेच पदाधिकारी, सभासद व महिला उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना बी.एच. गायकवाड म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये समय सुचकता असणे गरजेचे आहे. त्यांचे नेतृत्व धोरणात्मक निर्णय घेणारे व सर्वांना संघटीत करणारे नेतृत्व असावे. सर्वांप्रती मैत्री भावना असणे गरजेचे आहे. आपल्या कर्तव्याचे भान ठेवून कार्य करणे आवश्यक आहे. दुरदृष्टी ठेवून काम करण्याबरोबरच दिशा देणारे कार्य केल्यास समाजाला ते प्रेरणादायी ठरणारे आहे. नितीमता, सामाजिक बांधीलकी, प्रभावी वकृत्व, कल्पकता, कार्यक्षम दुरदृष्टीपणा नेतृत्व व्यक्तीमत्व विकास वाढीसाठी मोलाचे ठरणारे आहे, असे गायकवाड म्हणाले. त्यानंतर केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲड. एस.एस. वानखेडे यांनी उद्दीष्ट पूर्तता, संकल्प, क्षमता, गतिशिलता, सुसंघटना आदी मुद्यांवर मार्गदर्शन करून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी देखील मार्गदर्शन केले.
विवेक बुद्धी जागृत ठेवून काम करा: बी.एच. गायकवाड
