| पनवेल | वार्ताहर |
कामोठे येथील प्रभाग 12 येथे रस्त्यावर झाडू मारत असताना एका दुचाकीस्वाराने पनवेल महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराला धडक दिली. सुनील महादेव सज्जन असे सफाई कामगाराचे नाव असून, या अपघातामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर उपस्थितांनी सफाई कामगाराला कामोठे येथील पनवेल महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचारांनंतर त्याला नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान एक्सरे काढल्यानंतर पायाचे हाड तुटले असल्याने ऑपरेशन करावे लागेल, असे सांगण्यात आल्याने त्याला पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात वाशी येथे नेले आहे. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.