| पनवेल | वार्ताहर |
मंगळवारी (दि. 10) वटपौर्णिमा सण असल्याने घाऊक बाजारात कच्च्या फणसासोबत पिकलेल्या फणसाची चांगली आवक सुरु झाली आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी दरवर्षी वटपौर्णिमा दिनी उपवास करतात. यानिमित्त महिला एकमेकींना फळाचे वाण देत असतात. या वाणात आंब्यासह फणसाच्या गरांना मोठे महत्त्व आहे. घरात गोडधोड पदार्थ म्हणून स्त्रिया बरका फणसाच्या पोळ्या बनवतात. तर कापा फणस वाण भरण्यासाठी वापरतात. याच पार्श्वभूमीवर वटपौर्णिमा दिवसाच्या तीन-चार दिवस आधीच कोकणातून मोठ्या प्रमाणात फणस पनवेल परिसरात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे बाजारात फणसाचा गोड सुगंध सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.