| नेरळ | प्रतिनिध
माथेरान शहरात असलेल्या मध्य रेल्वेचे विश्रामगृहात काम करणार्या कामगाराचा खून झाला आहे. विश्रामगृहात काम करणार्या तीन कामगारांमध्ये मोबाईल फोन देण्यावरून हाणामारी झाली. त्यात दोघांनी चाकूने हल्ला करून 26 वर्षीय तरुणाचा खून केला आहे. याप्रकरणी माथेरान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
माथेरान शहरात मध्य रेल्वे प्रशासनाने अधिकारी विश्रामगृह आहे. ते विश्रामगृह मध्य रेल्वेने ठेकेदारी तत्त्वावर चालविण्यास दिले असून, सध्या तेथे येणारे अधिकारी आणि पाहुणे यांच्या दिमतीला चार कर्मचारी ठेकेदाराकडून ठेवण्यात आले आहेत. होळी सण साजरा होत असताना तेथे ठेकेदाराचे कर्मचारी असलेल्या चारपैकी तीन जणांमध्ये मोबाईल फोन देण्यावरून हाणामारी झाली. 13 मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी तीन तरुण भांडू लागले आणि शेवटी सुशांत सुनील गेजगे या 26 वर्षीय मित्रावर त्याच्या दोन मित्रांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुशांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी तेथे असलेला चौथा तरुण वाचवायला गेला असता त्यालादेखील किरकोळ जखम झाली. त्या घटनेची माहिती माथेरान पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन तरुणांना पकडून ताब्यात घेतले आहे.
माथेरान शहरातील बाजारपेठेत असलेल्या त्या रेल्वे अधिकारी विश्रामगृहात होळी सण साजरा होत असताना हाणामारी होत असताना स्थानिक लोकांना शुक्रवारी सकाळपर्यंत कोणतीही माहिती नव्हती. सकाळी रेल्वे विश्रामगृह येथे पोलीस आल्याचे पाहून काय घटना घडली याची माहिती मिळाली. सुशांत गेजगे या तरुणाचा खून झाला असल्याने पोलीस उपअधीक्षक डी.डी. टेले हे माथेरानमध्ये पोहचले असून, त्यांनी या खुनाच्या तपासाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी माथेरान स्टेशन प्रबंधक आणि विश्रामगृह ठेकेदार यांच्याकडून काही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. तर, पोलिसांनी खूनप्रकरणी साक्षीदाराच्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, चाकूहल्ला करणारे दोघा तरुणांची कसून चौकशी पोलीस करीत आहेत. गुन्हा दाखल होण्याची कार्यवाही सुरु असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या दोघांनी खून केला आहे काय? याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. त्याचवेळी हा खून नक्की कोणत्या कारणासाठी झाला याचादेखील उलगडा होणार आहे. मात्र, माथेरानसारख्या शांत ठिकाणी अशी घटना घडली असल्याने मध्य रेल्वे संशयाच्या भोवर्यात आली आहे.