सिडकोविरोधात कामोठेकर एकवटले

| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात सामाजिक चळवळीसाठी कामोठे नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. दुर्लक्षित असलेला मावेजा म्हणजेच जमिनीच्या वाढीव मोबदल्या असलेल्या प्रश्‍नसंदर्भात कामोठेकर आक्रमक झाले आहेत. याबाबत पहिल्यांदाच सिडको वसाहतीमध्ये एकता सामाजिक संस्थेने कामोठेत बैठक आयोजित केली होती. कामोठेमधील सर्व रहिवाशांनी संघटित होऊन या किचकट प्रकरणाचा पाठपुरावा करायचा असा निर्धार केला तसेच भविष्यात सिडकोने दुर्लक्ष केले तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे एकमताने ठरवण्यात आले.

सिडको आणि विकासक याच्या साटेलोटेमुळे आज रहिवाशांना वेठीस धरण्यात आले आहे. सिडकोच्या या मतलबी भूमिकेमुळे नागरिकाच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ही बैठक नंदकृपा सोसायटी, सेक्टर 11 कामोठे येथे घेण्यात आली. अमोल शितोळे, अल्पेश माने, बाळासाहेब सकपाळ, अजिनाथ सावंत, काशिनाथ जाधव, प्रकाश कुलकर्णी, तेलंगे आदींनी मार्गदर्शन केले, तसेच कन्व्हेयन्स डीड आणि मावेजाबद्दल अ‍ॅड. प्रमोद मोरे यांनी सविस्तर माहिती दिली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीला 40 हून अधिक सोसायटीमधील प्रतिनिधी हजर होते, तसेच रहिवाशांचादेखील मोठा प्रतिसाद मिळाला.
फोटो – सिडको विरोधात कामोठे येथील बैठक

Exit mobile version