। नवीन पनवेल । वार्ताहर ।
कामोठे सेक्टर 34, 35, व 36 च्या एका बाजूला कांदळवन पसरलेले आहे. या कांदळवनात काही समाजविघातक प्रवृत्ती या निरनिराळ्या प्रकारचे डेब्रिज व कचरा इत्यादी आणून ओतत असतात. ज्यामुळे कांदळवनाची हानी तर होतेच पण पर्यावरणाचीही हानी होऊन नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश होत आहे. तसेच त्या कांदळवानाच्या खाडीतल्या पाण्यातून अनेक सरपटणारे प्राणी व जलचर तेथील लगतच्या सोसायट्यांमध्ये शिरुन उपद्रव करत आहेत. तज्ञांच्या सल्ल्यानुसार किनार्यावर संरक्षक जाळी अथवा भिंत उभारण्यात यावी. अशी मागणी कफ या सामाजिक संस्थेने पनवेल महानगरपालिकेकडे केली आहे.
नागरिक सकाळी मोकळ्या हवेत जॉगिंग व व्यायाम करण्यास रस्त्यावर चालतात. फुटपाथवर व्यायाम प्रकार करतात. परंतु तेथे स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे तेथील कांदळवनातच ते कार्यभाग पूर्ण करतात. त्यामुळे तेथील निवासी इमारतीतील लोकांना उग्र दर्प जाणवतो. तेव्हा तेथे स्वच्छतागृहाची त्वरित व्यवस्था व्हावी व त्यात पाणी असावे. या मागण्यांचा विचार तातडीने विचार होऊन व अंमलबजावणी त्वरेने व्हावी आशा आशयाचे निवेदन कफतर्फे पनवेल पालिकेकडे देण्यात आले आहे.