| उरण | प्रतिनिधी |
वर्षानुवर्षे ओएनजीसीच्या कामकाजाचा गाडा आपल्या घामाने ओढणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर कथित कपातीची कुऱ्हाड चालविल्याने न्हावा सप्लाय बेसवर संतापाचा भडका उडाला आहे. कामगार कपातीविरोधात बुधवार दि.16 सप्टेंबरपासून कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थांसह महिलांनीही मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे. “न्याय हक्क आमचा आहे, भीक नाही!” असा एल्गार करत कामगारांनी ओएनजीसी प्रशासनाला आरपारच्या लढ्याचा इशारा दिला आहे.
कामगारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच महिन्यांपासून कामगार कपात थांबविण्याबाबत ओएनजीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष बैठका घेण्यात आल्या. मात्र, ठोस तोडगा निघाला नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यातच दि.31 ऑगस्टपासून तब्बल 20 ते 25 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 17 कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या 17 कामगारांमध्ये क्रेन विभागातील कामगारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी ओएनजीसी विभागातील पाच कामगारांना बडोदा येथे पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती कामगारांकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे ओएनजीसी विभाग बंद करण्याच्या हालचाली असून या विभागात सुमारे 10 ते 12 कामगार कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच न्हावा ओएनजीसी सप्लाय बेसमधून पाईप आणि इतर साहित्य गुजरातमधील पिपावाव येथे नेण्यात येत असल्याचा दावा कामगारांनी केला आहे. जवळपास 400 हून अधिक ट्रेलरमधून साहित्य गुजरातकडे नेण्यात आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे न्हावा सप्लाय बेसमधील कामकाजाचे भवितव्य, स्थानिक रोजगार आणि कंत्राटी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे “काम आमचे, घाम आमचा; मग रोजगार गुजरातला का?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे भवितव्य स्पष्ट न करता विभाग बंद किंवा कामाचे स्थलांतर केले जात असेल, तर त्यामागचे कारण काय, असा सवालही आता उपस्थित होत आहे. यावेळी अध्यक्ष राजेश घरत, सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच शैलेश पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, हनुमान भोईर, आशिष पाटील, रवींद्र पाटील, राजेश म्हात्रे, गणेश पाटील, संजय ठाकूर, प्रदीप ठाकूर, चेतन कडू, रमेश भोईर, प्रीतम पाटील, राकेश पाटील, विशाल पाटील, नवनाथ म्हात्रे, अजय पाटील, जयंत पाटील, निलेश भोईर, गौतम गायकवाड, जगन्नाथ मोरे, सुशांत बोन्द्रे, समाधान म्हात्रे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओएनजीसी विरोधात कामगारांचा एल्गार
