| तळा | वार्ताहर |
तळा विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता कक्ष व ग्रंथालय विभागाच्या वतीने अवयवदान जीवनदान या विषयावर आभासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश माने व डॉ. सुबधा कुडतळकर यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनील कुलकर्णी सदस्य महाविद्यालय विकास समिती यांनी भूषवले.
या कार्यशाळेत विद्यार्थी तसेच संस्थेचे सभासद यांनी भाग घेतला. डॉ. प्रकाश माने यांनी देहदान कशाप्रकारे करावयाचे याची रूपरेषा समजावून सांगितली व त्याचा फायदा समाजास व घरच्यांना आपल्या व्यक्तीचे अस्तित्व निरंतर कसे लक्षात राहील याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सुबधा कुडतळकर यांनी नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित करून नेत्रदानाचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम सर्व महाविद्यालयांमध्ये घेतले गेले पाहिजेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिवाकर कदम यांनी,तर आभार प्रदर्शन प्रा. मनोज वाढवळ यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. भगवान लोखंडे तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.