नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेवदंड्यात कार्यशाळा

| रेवदंडा | प्रतिनिधी |

नारळ उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि उत्पादनवाढीच्या प्रभावी पद्धतींची माहिती मिळावी. या उद्देशाने नारळ विकास बोर्ड, ठाणे (कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार) यांच्या माध्यमातून चौल-रेवदंडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी विशेष नारळ लागवड प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

रेवदंडा येथील दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमादरम्यान तालुका कृषी मंडळ अधिकारी सूर्यवंशी यांनी शेतीसाठी उपयुक्त ठरणारे ‘गोअमृत’ घरच्या घरी तयार करण्याची पद्धत व फॉर्म्युला शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह समजावून सांगितला. पीक वाढीसोबतच उत्पादन वाढीसाठी हे मिश्रण प्रभावी ठरू शकते, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध कृषीविषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक रवींद्र कुमार सिंह यांनी नारळ लागवडीसाठी उपलब्ध असलेले अनुदान, पाडेकऱ्यांसाठी ‘केरा सुरक्षा’ योजना, नारळाच्या वाढीसाठी मोफत खत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेत आधुनिक पद्धतींचा अवलंब करून नारळ उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, वसंत घरत, विनायक थळकर, सुधाकर राऊळ तसेच सचिव प्रकाश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. चौल व रेवदंडा परिसरातील अनेक नारळ उत्पादक शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित होते.

Exit mobile version