। माणगाव । प्रतिनिधी ।
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सिस्कॅप संस्था महाड यांच्यामार्फत शुक्रवार, दि.17 जून रोजी जागतिक मगर दिवस चांदे क्रीडांगणावर उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड-शेंगुलवार, अलिबाग तहसीलदार मीनल दळवी, सीस्कॅप संस्थेचे अध्यक्ष सागर मेस्त्री, गोवा जैवविविधता विभागाच्या उत्कर्षा चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत गोवा जैवविविधता विभागाच्या उत्कर्षा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना महाड परिसरात आढळून येणार्या मगर प्रजाती व त्यांच्या राहणीमान यावर मार्गदर्शन केले. तसेच सीस्कॅप संस्थेचे अध्यक्ष सागर मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांनी लुप्त होणार्या मगर प्रजातीचे संवर्धन व संरक्षण याबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख अतिथी प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड- शेंगुलवार यांनी मगर तसेच लुप्त होत आलेल्या इतर प्राणी प्रजातींचे संवर्धन करणे पुढील पिढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे मत मांडले. त्यानंतर विद्यार्थ्यांना जिवंत मगर व त्यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी नेऊन मार्गदर्शन करण्यात आले.