। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीपासून मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना रोखावे यासाठी पुन्हा एकदा भारतीय कुस्तीपटूंनी केंद्राकडे मागणी केलेली आहे.यासाठी बजरंग पुनिया यांच्यासह आंदोलनकर्ते कुस्तीपटू सराव सोडून पुन्हा भारतात दाखल झालेले आहेत. कुस्ती महासंंंघाची निवडणूक चर्चेचा विषय झाली आहे. या निवडणुकीत मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात यावे,अशी मागणी आंदोलक कुस्तीपटूंनी केंद्र सरकारकडे केली होती. मात्र निवडणुकीच्या रिंगणात ब्रिजभूषण यांचे जावई संजय कुमार सिंह उतरल्याने त्यांना या निवडणुकीपासून रोखावे,अशी मागणी टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने केंद्र सरकारकडे केली आहे. आंदोलनकर्त्यांना दिलेले वचन केंद्र सरकारने पाळावे असे आवाहनही बजरंग पुनियाने केले.
ब्रिजभूषण शरण सिंहची जवळची व्यक्ती निवडणूक लढवत आहे. संजय कुमार सिंह भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. जर संजय कुमार निवडणूक जिंकले तर ती निवडणूक बृजभूषण शरण सिंह जिंकल्यासारखे आहे.फ मसरकारने आम्हाला वचन दिलं होतं की जे बृजभूषण यांच्या जवळचे आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील आहेत त्यांना निवडणूक लढवण्यापासून मज्जाव केला जाईल. मात्र या प्रकरणात असं काही दिसत नाही.
बजरंग पुनिया ,कुस्तीपटू
बजरंग पुनिया म्हणाला की, सरकारने त्यांचे वचन पाळले पाहिजे. नाहीतर महिला कुस्तीपटू सुरक्षित राहणार नाहीत. महिला कुस्तीपटू किती दिवस दहशतीखाली राहणार? संजय सिंह हे उत्तर प्रदेश कुस्तीसंघाचे उपाध्यक्ष आहेत. ब्रिजभूषण हे आपल्या मर्जीतील व्यक्तीला पदावर बसवून भारतीय कुस्ती महासंघावरील आपले नियंत्रण पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,असा आरोपही त्याने केला.
बजरंगने सराव अर्ध्यावर सोडला
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजरंग पुनिया किर्गिस्तान येथील आपला सराव कमी करून भारतात परतला आहे. 2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या अनिता श्योरान या भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. अनिता या बृजभूषण सिंह यांच्याविरूद्धच्या केसमध्ये साक्षीदार आहेत. त्यांना बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्यासह अजून दोन कुस्तीपटूंचे समर्थन आहे. प्रत्येक विभागासाठी सर्वसंमतीने उमेदवार ठरवण्याचा विचार होता जेणेकरून निवडणूक टाळता आली असती. मंत्र जवळपास 20 ते 25 राज्य संघटनांनी बृजभूषण यांनी निवडलेल्या उमेदवारांना पाठिंवा दिला आहे. बृजभूषण यांनी आपल्या पसंतीचे उमेदवार देत निवडणुकीतून माघार न घेतल्याचे संकेत दिले.