। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या अनेक अडचणींनतर दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊन निश्चिंत होत असताना आता आणखी एक नवी अडचण उभी राहिली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी वेतन आणि इतर मागण्यांसाठी दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 30 हजार शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे 1200 गठ्ठे तपासणीविना पडून राहणार आहेत. या कारणास्तव दहावी आणि बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर काय मार्ग काढला जाणार हे महत्वाचं ठरणार आहे.