। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड-आंबेवाडी बाजारपेठेत मोकाट गुरांमुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत होती. तसेच, ही मोकाट गुरे देखील अनेकवेळा वाहनांच्या धडकेने अपघातात जखमी होत होती. याविषयी अनेकवेळा ‘कृषीवल’मधून या बाबतच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत या परिसरातील सामाजिक कार्यकर्तांकडून मोकाट गुरांच्या गळ्यात पिवळ्या रंगाचे रिफ्लेक्टर बांधण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर आंबेवाडी बाजारपेठेत रात्रीच्या अंधारात मोकाट गुरे रस्त्यात बस्तान मांडून बसत आहेत. या मोकाट गुरांमुळे अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी अनेक वेळा गुरांच्या धडकेत जखमी होत आहेत. त्यामुळे मोकाट सोडलेल्या गुरांचे मालक त्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, वाहनांमुळे जर गुरे जखमी झाले तर भरपाई मागण्यासाठी धावत येत आहेत. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून येथील स्थानिक युवकांनी येथील प्रत्येक गुरांच्या गळ्यात रिफ्लेक्टर पट्टे लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. जेणेकन रात्रीच्या वेळी गाडी चालकाला समोर असलेली गुरे दिसण्यात मदत होईल व त्यामुळे होणार्या अपघातावर आळा बसेल. तसेच, या उपक्रमाद्वारे भटक्या कुत्र्यांना देखील हे रिफ्लेक्टर पट्टे लावण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे, निलेश लोखंडे, अजय कुशवहा, ओम वाचकवडे, विराज शिंदे, अखिलेश यादव, अनुप गुप्ता, संदेश यादव, संग्राम शिंदे, समीर इंगवले, श्रेयस सुर्वे यांनी विशेष सहकार्य केले आहे.