खरेदीसाठी खवय्यांची लगबग; रानमेवा विक्रीतून महिलांना रोजगार
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
काजुगराच्या हंगामाला सुरुवात झाली असून सुधागड येथील बाजारात काही प्रमाणात ओले काजूगर विक्रीसाठी येत आहेत. दरम्यान, पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासी महिला ओले काजूगर व कैर्या हा रानमेवा विक्रीसाठी बसत आहेत. त्यामध्ये ओले काजूगर म्हटले की सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. दर्शन घेतल्यानंतर या भाविकांचा रानमेवा खरेदी करण्याचा मोह काही आवरत नाही. त्यामुळे येथील अदिवासी महिलांना चांगला रोजगार मिळत आहे.
सुधागड तालुक्यातील विविध ठिकाणी आदिवासी महिला हा रानमेवा विकायला घेऊन येत आहेत. सध्या या रानमेव्याला चांगला भाव मिळत असल्याने त्याही आनंदी आहेत. काजूगर शेकड्याने आणि वाट्यावर देखील मिळतो. तब्बल 200 ते 300 रुपये शेकड्याने हे काजूगर भेटत आहेत. किंमत वधारली असली तरी हंगामात काजूगर खरेदीसाठी खवय्ये लगबग करीत आहेत. साधारण महिन्याभरानंतर उत्पादन वाढल्यावर काजूगर मुबलक उपलब्ध होतील. त्याचबरोबर काजूगर विकून आदिवासींना रोजगार उपग्ब्ध झाला असून त्यांना चांगले पैसे देखील मिळत आहेत.
मेहनत व हातांची दुरवस्था
आदिवासी बांधवांना काजुच्या बिया काढण्यासाठी दुर्गम, डोंगराळ भागात आणि जंगलात उन्हातान्हात अनवाणी पायांनी जावे लागते. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो. आदिवासी महिला व बांधव या बियांमधून काजूगर काढतांना हातात मोजे घालत नाही किंवा कोणतीही सुरक्षितता घेत नाही. त्यामुळे त्यांचे हात व बोटे चिकामुळे पुर्णपणे खराब होतात. काही जण हातातला राख लावतात. परंतु, त्याने काही एक फरक पडत नाही. शासनाकडून त्यांना हातमोजे देणे तसेच सहाय्य करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.