। कर्जत । वार्ताहर ।
मुंबई-पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर रेल्वे मार्गातील कर्जत येथील नवीन रेल्वे स्थानकाला वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केली आहे. या मागणीबाबतचे पत्र केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे तसेच खा. सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आले आहे.
या संदर्भात कर्ततमध्ये सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना घारे म्हणाले की, आपल्याकडे मुंबई-कर्जत असा जो रेल्वेमार्ग आहे, तो मुंबई-ठाणे-कल्याण-बदलापूर-कर्जत असा आहे. मात्र, आता पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर होत असल्याने कर्जतच्या विकासाला गती मिळणार असून रेल्वे प्रवाशांची देखील गैरसोय दुर होणार आहे. पुढे बोलताना घारे म्हणाले की, कर्जतचे सुपुत्र आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे क्रांतीकारक वीर हुतात्मा हिराजी पाटील यांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात दिलेला लढा हा अत्यंत जाज्ज्वल्य इतिहास आहे. ब्रिटाशांविरोधात लढताना सिद्धगडच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांना हौतात्म्य आले. अशा या वीर हुतात्म्यांचे स्मरण रहावे तसेच त्यांचे कार्य भावी पिढीला प्रेरणादायी ठरावे या उद्देशाने कर्जत येथे नव्याने होत असलेल्या रेल्वे स्थानकाला वीर हुतात्मा हिराजी पाटील असे नाव द्यावे, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली असल्याचे घारे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या मागणीसाठी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल शासनाने घेतली असून त्याबाबत चौकशी सुरु झाली असल्याचे घारे यांनी सांगितले आहे.