। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
चौथ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरलेले आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांनी घोषणांचा सपाटा लावला आहे. आता त्यांनी रविवारी(दि.19) पत्रकार परिषद घेऊन सफाई कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने अनुदानावर जमीन उपलब्ध करून दिल्यास दिल्ली सरकार त्यावर घरे बांधेल आणि सुलभ हप्त्यांमध्ये सफाई कामगारांना मालकी हक्क देईल, अशी घोषणा केजरीवालांनी केली आहे.
दिल्लीतील जमिनीचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत आहे, म्हणून अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून यासंदर्भात विनंती केली आहे. केजरीवाल आपल्या पत्रात म्हणाले की, पंतप्रधान मोदीजी, मी एनडीएमसी आणि एमसीडी भागात काम करणार्या सफाई कर्मचार्यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहितो आहे. हे कर्मचारी आपल्या शहराच्या स्वच्छता व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या सेवेदरम्यान ते सरकारी घरांमध्ये राहतात, परंतु सेवानिवृत्तीनंतर त्यांना ही घरे रिकामी करावी लागतात. ते स्वतःचे घर विकत घेऊ शकत नाहीत किंवा दिल्लीत महागडे भाड्याचे निवासस्थान घेऊ शकत नाहीत. दिल्लीतील जमिनीशी संबंधित बाबी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने आपणास विनंती आहे की, स्वच्छता कामगारांना सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून द्यावी. या जमिनींवर दिल्ली सरकार त्यांच्यासाठी घरे बांधेल अन् कर्मचारी या घरांची किंमत सरकारला सुलभ हप्त्यांमध्ये परत करतील.
केजरीवाल पुढे म्हणतात, ही सर्व सरकारी कर्मचार्यांची, विशेषत: खालच्या वर्गातील कर्मचार्यांची समस्या आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना स्वच्छता कर्मचार्यांपासून सुरू करून सर्व सरकारी कर्मचार्यांसाठी लागू करावी. मला विश्वास आहे की, तुम्ही हा प्रस्ताव मान्य कराल आणि लवकरच कृती आराखडा बनवून त्यावर काम कराल. भाजपवर निशाणा साधत अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज आपण ज्या प्रकारचा प्रचार पाहत आहोत, अशा प्रकारचा प्रचार दिल्लीतील जनतेने याआधी पाहिला नाही. दिल्लीतील जनतेने आजपर्यंत असा हिंसाचार पाहिला नाही, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. नवी दिल्लीच्या जागेवर केजरीवाल यांना 20 हजार मतांनी पराभूत केल्याच्या भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या दाव्यावर आप सुप्रिमो म्हणाले, त्यांना काही दिवस स्वप्नात जगू द्या, त्यात काही नुकसान नाही. मला ते लेखी द्या.