पोलिसांच्या दाव्यानं खळबळ
। मुंबई । वृत्तसंस्था ।
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणार्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदम्यान पोलिसांकडून आरोपीबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. सैफ अली खानवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे न्यायाधिशांनी देखील सुनावणीदरम्यान अशीच टिप्पणी केली आहे. यात आंतराष्ट्रीय पातळीवरचा कट रचल्याचा संशय आहे असे म्हटले आहे.
सैफ अली खान याच्यावर त्याच्याच घरात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. अखेर या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून बांद्रातील हॉलीडे कोर्टात हजर केले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे वकीलपत्र घेण्यासाठी वकिलांमध्ये रस्सखेच पाहायला मिळाली. दोन वकील स्वत:हून पुढे आले न्यायालयानं दोन्ही वकिलांना आरोपीची बाजू मांडण्याची परवानगी दिली. युक्तिवादाच्या वेळी सैफ अली खानवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असू शकतो असा दावा पोलिसांनी केला, तर न्यायालयाने देखील याबाबत संशय व्यक्त केला आहे.
दोन्ही बाजुने जोरदार युक्तिवाद झाला. सुनावणीदरम्यान पोलिसांनी आरोपीबाबत माहिती देताना न्यायालयात म्हटलं की, आरोपी भारतात अवैधरित्या वास्तव्य करत आहे. त्याने सैफ अली खान यांच्या घरात प्रवेश करून तिघांना जखमी केलेले आहे. इथे त्याला कोणी मतद केली आहे का? आरोपीकडे एक चाकू आहे तो शोधायचा आहे, तसेच त्याने बदललेले कपडे लपून ठेवले आहेत, ते पण शोधायचे आहेत. त्यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. तर येथे अभिनेत्याच्या घरी हा प्रकार झाला म्हणून आज हे प्रकरण मीडियाने उचलून धरले आहे. याच जागी एखाद्या सामांन्याच्या घरी हा प्रकार घडला असता तर त्याला तेवढं महत्व प्राप्त झाल नसत, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची कोठडी सुनावली.