| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
थोडाही, वीस-पंचवीस मिनिटांचा विलंब झाला असता तर आम्हा दोघीही बहिणींची हत्या झाली असती, अशा शब्दांत भारतात आश्रयाला असलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या आपबितीचे एक व्हिडिओ जारी करून वर्णन केले. या व्हिडिओमध्ये शेख हसीना भावुक झाल्याचे दिसत आहे. बांगलादेशात गेल्यावर्षी विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन शिगेला पोहोचून जमाव थेट शेख हसीना यांच्या निवासस्थानी घुसला होता. त्यावेळी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला नसता तर त्यांची तसेच त्यांच्या भगिनी शेख रेहाना यांची हत्या झाली असती. आपल्या हत्येचा कटच रचण्यात आला होता, असा दावा शेख हसीना यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे. आपल्या हत्येचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. 21 ऑगस्ट 2004 रोजीही ढाक्यातील दहशतवाद विरोधी रॅलीमध्ये बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. शिवाय 2000 मध्येही त्यांच्या सभास्थळी 76 किलोंचा बॉम्ब निकामी करण्यात आला होता. आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा हत्येचे प्रयत्न झाले. पण ईश्वराच्या कृपेमुळे प्रत्येकवेळी बचावलो, असे हसीना यांनी म्हटले आहे.