। सोलापूर । वृत्तसंस्था ।
लाडकी बहिण योजनेच्या अपात्र महिलांवर कारवाई केली जाणार असल्याने काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली आहे. दंडासह पैसे वसूल केले जाणार, त्या भीतीमुळे काही अपात्र महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही यावरून टीका केली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
प्रणिती शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाहीत, उलट बिघडवत आहेत. त्यामुळे कृपया माझ्या देशाला वाचवा म्हणून विनंती करते असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा केला आहे. त्या सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. जेव्हा काँग्रेसचे सरकार होतं, तेव्हा विडी कामगारांचे कारखाने वाचले, कामगारांना पेन्शन मिळत होतं, सिलेंडर फक्त 800 रुपयाला होतं. आता संजय गांधी निराधार योजना पण बंद झाली आणि लाडकी बहीण पण बंद होणार आहे. लाडकी बहिणीमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं, मात्र आता लाडकी बहिणही सावत्र झाली आहे. पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि संरक्षण मिळणार आहे का..? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.
पैसे घेऊन तुम्हाला दोन दिवसांसाठी आनंद मिळेल नंतर नवर्याचा मार खा. पैसे घेऊन दारू थांबणार नाही, मग या पैशाचा काय उपयोग..? सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. मात्र भाजपला वाटते की ते तुम्हाला पैशाने खरेदी करू शकतात. मी बोलून बोलून थकले आता तुम्हाला समजायला पाहिजे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. यापुर्वीही प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य दिवाळखोरीत निघाल्याची टीका राज्य सरकारवर केली होती. तर लाडकी बहिण योजनेत निकष लावल्यांनंतरही प्रणिती शिंदे आक्रमक झाल्या होत्या. लाडकी बहीण म्हणजे निवडणुकींसाठीचा चुनावी जुमला होता, असा टोला त्यांनी लगावला होता.