यंग भारत सेवा मंडळ कुमार गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा – 2023.

अंकुर स्पोर्टस्‌‍ श्रीराम मंडळ विश्वस्त, शिवमुद्रा प्रतिष्ठान, एस.एस.जी. फाऊंडेशन उपांत्यपूर्व फेरीत दाखल


| मुंबई | वृत्तसंस्था |

अंकुर स्पोर्टस्‌‍ श्रीराम मंडळ विश्वस्त, शिवमुद्रा प्रतिष्ठान, एस.एस.जी. फाऊंडेशन यांनी यंग भारत सेवा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. आजच्या दिवसाचा मानकरी ठरला तो जय भारतचा साहिल डगरे. प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी मनोरंजन मैदानातील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्व. गोपीनाथ जाधव क्रीडांगणावर दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात अंकुर स्पोर्टस्‌‍ ने विजय नवनाथ मंडळाचा 54-37 असा पाडाव करीत आगेकूच केली. पहिल्या सत्रात लोण देत 26-17अशी आघाडी घेणाऱ्या अंकुरने दुसऱ्या सत्रात आणखी दोन लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. अमन मण्यार, साईश शिंदे यांच्या आक्रमक चढाया त्याला अनिल कोलते यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय शक्य झाला. विजय नवनाथ कडून सतीश महागावकर, सचिन लोके यांनी उत्कृष्ट प्रतिकार करीत दोन लोणची परत फेड केली. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले.

दुसऱ्या सामन्यात शिवमुद्रा प्रतिष्ठानने ज्ञान प्रकाश मंडळाचा 47-10 असा सहज पराभव केला. विश्रांतीला 34-02 अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या शिवमुद्राने नंतर सावध खेळ करीत विजय साकारला. विराज लाड, विवेक चव्हाण यांच्या तुफानी खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. श्रीराम मंडळ विश्वस्तने चुरशीच्या लढतीत गुड मॉर्निंगचा कडवा प्रतिकार 30-23असा मोडून काढला. सलग दोन गुण घेत गुड मॉर्निगने सुरुवात झोकात केली. पहिली 10 मिनिटे गुणफलक सतत दोलायमान अवस्थेत होता. दोन वेळा तो बरोबरीत देखील झाला. पण त्यातून सावरत पहिला लोण देत श्रीरामने पूर्वार्धात 15-12 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आहे ती आघाडी टिकविण्यावर भर देत 10 गुणांच्या फरकाने सामना आपल्या बाजूने झुकवीला. देव शर्मा, सौरभ माळी यांच्या धूर्त चढाया त्यांना मोक्याच्या क्षणी पकडी करून विकी यादव यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय शक्य झाला. गुड मॉर्निग कडून प्रणय टेंबरकर, सिद्धेश पिसाळ, ऋषिकेश चिता यांनी उत्कृष्ट खेळ करीत शेवटच्या क्षणापर्यंत निकराचे प्रयत्न केले. पण तो त्यांच्या हातून निसटला.

शेवटच्या सामन्यात धारावीच्या एस.एस.जी. फाऊंडेशनने जय भारतवर 44-34 अशी मात केली. पहिल्या डावात 19-23 अशा 4गुणांनी पिछाडीवर पडलेल्या एस.एस.जी.ने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत 10गुणांच्या फरकाने आपला विजय साकारला. दिवेश गवळी, ऋग्वेद तेतगुरे यांनी दुसऱ्या डावात चढाई पकडीचा जोश पूर्ण खेळ करीत या विजयात महत्वाचा वाटा उचलला. जय भारतच्या साहिल डगरे, निरंजन साळुंखे यांनी पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ करीत संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात त्यांचा खेळ ढेपाळला. आज या स्पर्धेला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी खेळाडू जेम्स परेरा यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version