| मुंबई | प्रतिनिधी |
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येत आहेत. राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान, दर्शनासाठी जळगावहून आलेल्या एका 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आलेल्या जळगाव येथील 25 वर्षीय तरुण जयदीप मेघराज नेमाडे याचा दर्शनासाठी रांगेत उभे असताना मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. हा तरूण ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून, गुरुवारी (दि.17) रात्री तो लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेत उभा असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तो अचानक खाली कोसळला. या घटनेची माहिती मिळताच मंदिरात उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तरूणाला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तसेच, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.



