दोन महिला जखमी
। पनवेल । वार्ताहर ।
सायन-पनवेल मार्गावरील कळंबोली येथील पुलावर भीषण अपघात घडला. पत्नी व मेहुणीसह जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव टँकरने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी व मेहुणी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्रदीप चंद्रकांत कांबळे (32) असे मृत तरुणाचे नाव असून जखमी झालेल्या त्याच्या पत्नीचे नाव अंजली कांबळे (26), तर मेहुणीचे नाव ज्योती गिरजू किर्वे (24) असे आहे. प्रदीप बुधवारी कामानिमित्त पत्नीसह खारघर येथे आला होता; तर त्याची मेहुणी ज्योतीदेखील आली होती. सायंकाळी प्रदीप व त्याची पत्नी अंजली हे दोघेही ज्योतीला कामोठे येथील घरी सोडण्यासाठी निघाले होते. प्रदीप दुचाकीवरून पत्नी व मेहुणीला घेऊन खारघर येथून कामोठे येथे जात होते. दरम्यान, ते सायन-पनवेल मार्गावरील तळोजा फाटा येथील उड्डाणपुलावर आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव टँकरची त्यांच्या दुचाकीला धडक लागली. यात प्रदीपचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी व मेहुणी गंभीर जखमी झाल्या आहेत.
