। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील तक्का सिग्नल परिसरात रेडियमचे काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तीने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. शाकीन समीर खान असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
या घटनेतील जखमी शाकीन समीर खान हा पनवेलच्या कोळखे गाव परिसरात राहतो. तो तक्का सिग्नलजवळील शिवम आर्टस या दुकानात नऊ महिन्यांपासून रेडियमचे काम करत आहे. शाकीन नेहमीप्रमाणे कामावर आला होता, त्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत काम करत होता. मध्यरात्री सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास बाहेर मुसळधार पाऊस सुरु असताना तो आपल्या दुकानात बसला होता. याचवेळी पाठीमागून अचानक आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्याच्या डोक्यावर कोयत्याने जोरदार वार केला.
पहिल्या वारानंतर काय घडलं हे समजण्यापूर्वीच दुसरा घाव बसल्याने तो घाबरून दुकानाबाहेर पळाला. यावेळी बाहेर एक व्यक्ती धावताना दिसल्याने शाकीनने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार आणि पावसामुळे हल्लेखोराचा चेहरा त्याला दिसला नाही. काही अंतर गेल्यानंतर डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात येताच तो पुन्हा दुकानात परतला. तेव्हा दुकानात कोयता पडलेला असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. हॉस्पीटलमध्ये विभागात या हल्ल्यात शाकीन गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ कामोठे येथील एमजीएम अतिदक्षता उपचारासाठी दाखल करण्यात आले. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी शाकीन खान याच्या जबाबावरून अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच या हल्ल्यामागील कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
Crime News: तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
