| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील हिंदमाता ब्रीजवर एका तरुणीचा अपघाती मृत्यू झाला आहे. आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणीचा लग्नाच्या तोंडावर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. होणाऱ्या पतीसोबत दुचाकीवरुन जात असताना झालेल्या अपघातामध्ये तिला प्राण गमवावे लागले. या अपघातात तिचा पतीही जखमी झाला आहे. ही घटना मुंबईतील परळ परिसरात घडली आहे. वाहन चालकाच्या विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकिता दळवी (25) असे मयत तरुणीचे नाव असून, तिचा होणारा पती संदीप कुद्रे हा या अपघातामध्ये जखमी झाला आहे. निकिता आणि संदीप सायंकाळी 7.30 च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील हिंदमाता पुलावरुन उतरत होते. यावेळी त्यांची स्कूटर अचानक ऑइलवरुन घसरली आणि हे दोघेही डाव्या बाजूला पडले. याचवेळी कार निकिताच्या अंगावरुन गेली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निकिताला संदीपने तात्काळ उचललं आणि केईएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. निकिता दळवी एका कंपनीत अकाऊंटट म्हणून काम करत होती. मूळ कोल्हापूरचा असलेला संदीप कुद्रे मुंबईत केसरी टूर्समध्ये नोकरीला आहे. त्याचे कांजुरमार्गला राहणाऱ्या निकितासोबत लग्न जमले होते. हे जोडपे 7 मे रोजी लग्न करणार होते.