यंगस्टार खारपाडा संघाला विजेतेपद

| चिरनेर | प्रतिनिधी |

खारपाडा येथील श्री कुलदैवत क्रिकेट स्पोर्ट्सच्यावतीने शनिवारी (दि.14) येथील मैदानावर एक दिवसीय दिवस-रात्र अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंगस्टार खारपाडा संघाने जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेला खेळाडूंसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या सामन्यामध्ये स्थानिक 8 तसेच बाहेरील 8 संघांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अंतिम सामन्यात दमदार आणि संयमी खेळ करत यंगस्टार खारपाडा संघाने विजेतेपद मिळविले. तर, शांतिनगर जिते संघाने द्वितीय पारितोषिक मिळवत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील सन्मानचिन्ह व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. त्यात उत्कृष्ट गोलंदांज म्हणून उपेश घरत (खारपाडा) व उत्कृष्ट फलंदाज म्हणून कौतुक म्हात्रे (जिते) यांना गौरवण्यात आले. तर, अनिरुद्ध ठाकूर (खारपाडा) हा मालिकावीर ठरला. खारपाडा येथील मैदानावर पार पडलेल्या या दिवस-रात्र अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडाप्रेमाची भावना अधिक दृढ झाली आहे. या स्पर्धेचे आयोजन, नियोजन व व्यवस्थापन शिस्तबद्ध व उत्तम केल्याबद्दल कुलदैवत खारपाडा टीमचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version