| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील जीवना कोळीवाडा येथे ऑक्टोबर 2023 सालात सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा एका भाड्याच्या खोलीत सुरू करण्यात आला. आपला दवाखानाचे उद्घाटन शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. आपला दवाखान्यात एका वर्षाच्या करारावर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, कंत्राट संपलेल्या जागेवर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने सध्या आपला दवाखाना वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली आपला दवाखाना ही आरोग्य योजना आहे. उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयामधून रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ताप, सर्दी आजारांसाठी रुग्णांना उपचार व वैद्यकीय चाचण्यांसाठी रूग्णालये गाठावी लागत. रुग्णालयापासून दूर अंतरावरील रूग्णांना लहान सहान आजार उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागते. यामध्ये वेळेचा अपव्यय व नाहक खर्च रूग्णांना करावा लागतो.रुग्णांची उपचाराबाबत गैरसोय होऊ नये या कारणास्तव सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दवाखाना या माध्यमातून विनामूल्य आरोग्य व मोफत उपचार सेवा सुरू करण्यात आली.
जीवना कोळीवाडा येथे ऑक्टोबर 2023 रोजी एका भाड्याच्या खोलीत सकाळी सात ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत आपला दवाखाना सुरू करण्यात आला. कंत्राटी पध्दतीने एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका व एक मदतनीस अशा जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जागा भरण्यात आल्या. एका वर्षाचे वैद्यकीय अधिकारी यांचे कंत्राट संपल्यावर सदरचा वैद्यकीय अधिकारी दुसऱ्या ठिकाणी सेवेत रुजू झाला; परंतु श्रीवर्धन येथील आपला दवाखान्यात रिक्त जागेवर अद्यापही कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. सध्या आपला दवाखाना हा एक परिचारिका व एक मदतनीस सांभाळत आहेत व दवाखान्यात पुरेसा औषध पुरवठा उपलब्ध आहे, ही जमेची बाजू आहे. लवकरात लवकर जीवना कोळीवाडा येथील आपला दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करावात्र अशी मागणी तेथील नागरिक करीत आहेत.
जीवना कोळीवाडा येथील आपला दवाखानामध्ये लवकर डॉक्टरची नियुक्ती होईल. अलिबाग येथील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात या बाबतीत प्रस्ताव पाठवला आहे.
डॉ. संतोष नारायणकर,
तालुका आरोग्य अधिकारी, श्रीवर्धन