| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल येथून जेएनपीटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलर चालकाने भररस्त्यात धोकादायकरित्या ट्रेलर थांबवल्याने पाठीमागून येणारी भरधाव कार ट्रेलरवर धडकून झालेल्या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू, तर कारचालकासह इतर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना पनवेलजवळच्या पुष्पक नगर येथे घडली. रेश्मा रवींद्र तोरस्कर (46) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. राकेश रवींद्र तोरस्कर (25), गितेश गोपाळ कुलये (32) व स्नेहा राजेंद्र जाधव (20) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.
तोरस्कर कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक मुंबईत नेपेन्सी रोड येथील जयप्रकाश नगरमध्ये पाच जण राहतात. तोरस्कर कुटुंबीय संगमेश्वर येथील आपल्या मूळ गावी गेले होते. त्यानंतर ते सर्वजण त्यांच्या कारने मुंबईत परतत होते. त्यांची कार रेश्मा यांचा मुलगा राकेश तोरस्कर चालवत होता. त्यांची कार पनवेल जेएनपीटी मार्गावर पुष्पक नगर जवळ आली असताना जेएनपीटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरचालकाने अचानक भररस्त्यात ट्रेलर थांबवला. त्यामुळे पाठीमागून भरधाव वेगाने येणारी तोरस्करची कार या ट्रेलरवर धडकली व ट्रेलरच्या पाठीमागे अडकून पडली. या अपघातात रेश्मा यांचा मृत्यू झाला, तर राकेश, गितेश व स्नेहा असे तिघेजण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेला ट्रेलरचालक शंभू प्रेमचंद कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.