अलिबागमध्ये शून्य सावली दिवस 14 मे रोजी; खगोलील चमत्कार पाहण्याचे अभ्यासकांचे आवाहन
| रायगड | प्रतिनिधी |
सावली आपली साथ कधीच सोडत नाही, ही एक म्हण. पण, वर्षातून दोन दिवस असे असतात, की ही सावली तुम्हाला अनुभवता येत नाही. या दिवसाला शून्य सावली दिवस असे म्हटले जाते. सूर्य अगदी 90 अंशाच्या कोनात डोक्यावर येणार असल्याने 7 मे पासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या तारखेला दुपारी 12.00 वाजता सावली बेपत्ता होण्याचा अनुभव घेता येणार आहे.
शून्य सावलीची संकल्पना कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषांच्या मधल्या पट्ट्यातच सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरूप पडतात. त्यामूळे या भागातूनच वर्षातून दोनदा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. त्यामूळे तेथे नेहमी तिरपी सावली पडते. पृथ्वीचा अक्ष जर सरळ 90 अंश कोनात असता तर विषुववृत्तावरच नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती.
भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे 6.78 अंश अक्षवृत्तावर 6 एप्रिल आणि 5 सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे 10 एप्रिल आणि 1 सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो. तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे 2 मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो. शेवटी भोपाल जवळ 23.5 अंशावर 18 जून रोजी शून्य सावली दिवस पाहता येतो. लगेच दक्षिणायन सुरु होताच पुन्हा भोपाल ते अंदमान भागापर्यंत पुन्हा पावसाळ्यात शून्य सावली दिवस येतात. परंतु, ढग आणि पाऊस असल्याने आपल्याला बहुदा हे दिवस अनुभवता येत नाही.
हा क्षण अनुभवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. त्यासाठी साहित्य म्हणजे दोन, तीन इंच व्यासाचा आणि एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू ठेवावी किंवा स्वता उन्हात सरळ उभे रहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही. सावलीने थोडा वेळ का होईना साथ सोडलेली असेल. हा एक भौगोलिक, गणितीय आणि वैज्ञानिक प्रयोग आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा प्रयोग अवश्य पहावा, असे आवाहन खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात
7 मे कोल्हापूर, मिरज, सांगली, 10 मे सातारा, अक्कलकोट, 11 मे वाई, महाबळेश्वर, 12 मे बारामती, बार्शी, 13 मे लातूर, 14 मे अलिबाग, दौंड, पूणे, 15 मे मुंबई, 16 मे नगर, कल्याण, नांदेड, ठाणे, 18 मे पैठण, 19 मे जालना, 20 मे संभाजी नगर, नाशिक, 21 मे मनमाड, 22 मे यवतमाळ, 23 मे बुलढाणा, मालेगाव, 24 मे अकोला, 25 मे अमरावती, 26 मे जळगाव, भुसावळ आणि नागपूर येथे शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. या ठिकाणी ठिक दुपारी 12.00 वाजता सूर्य अगदी डोक्यावर येईल.
