मोबाईल अ‍ॅपद्वारे युवक काँग्रेसची सदस्य नोंदणी

अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला राज्यात सुरुवात झाली असून प्रथमच विथ आयवायसी (iyc) या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सदस्य नोंदणी आणि उमेदवारी निवडणूक अर्ज स्विकारण्यात येणार असल्याची माहिती कोकण निवडणूक निर्णय अधिकारी ठाकूरसिंग बिस्टा यांनी दिली.
बॅ. अ. र. अंतुले काँग्रेस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अ‍ॅड श्रद्धा ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड प्रथमेश ठाकूर, अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मगर, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड कौत्सुभ पुनकर उपस्थित होते.
ठाकूसिंग बिस्टा यांनी यावेळी सांगितले की, विधानसभा मतदारसंघासाठी 24 सदस्यांची कमिटी, जिल्हा कार्यकारिणीसाठी 24, राज्य कमीटीसाठी 6 तर राज्य सरचिटणीस कमिटीसाठी 28 सदस्य यांच्यासाठी निवडणुक घेण्यात येणार आहे. युवक काँग्रेसच्या सदस्य आणि उमेदवारी अर्ज प्रक्रियेसाठी 18 ते 35 वयोगटात असणे आवश्यक असून तो भारताचा नागरिक असला पाहिजे. तसेच इतर कोणत्याही राजकीय संघटनेचा सदस्य असता कामा नये.
विथ आयवायसी या मोबाईल अ‍ॅपद्वारे घेण्यात येणार्‍या या निवडणूकीसाठी फक्त अँन्ड्राईड मोबाईलद्वारेच प्रक्रीयेत सहभाग घेता येणार आहे. अ‍ॅपल किंवा इतर सिस्टीमद्वारे हे अ‍ॅप चालु शकणार नाही. 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन प्रक्रियेद्वारे या निवडणूकीत सहभाग घेता येणार असल्यचे बिस्टा म्हणाले. योग्य कागदपत्रांच्या आधारेच यात सहभाग घेता येणार असल्याचेही ते म्हणाले.

Exit mobile version