रामनगर येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

| पाली/बेणसे | प्रतिनिधी।

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रामवाडी येथे विहिरीत बुडून 21वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावावर शोककळा पसरली आहे. विघ्नेश सुरेश तेलंगे 21) रा. रामनगर असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रासळ ग्रामपंचायत हद्दीतील रामवाडी येथे विघ्नेश तेलंगे हा आपल्या चार मित्रांसोबत परिसरातील एका विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी विहिरीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र, विहीर खोल असून पाणी गढूळ असल्याने शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. यानंतर पाली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला
.
विहिरीतील पाण्याचा मोठा साठा आणि कमी दृश्यमानता लक्षात घेऊन कोलाड येथील विशेष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने अनेक तास अथक प्रयत्न करून विघ्नेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेमुळे तेलंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अवघ्या 21व्या वर्षी विघ्नेशचा झालेला मृत्यू गावकऱ्यांसाठी ही मोठा धक्का ठरला आहे. घटनेनंतर नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या प्रकरणाची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेची सर्व परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version