ताम्हिणी घाटातील मिल्की बार वॉटरफॉल येथील दुर्घटना
। माणगाव । प्रतिनिधी ।
निसर्गाचे सौंदर्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटनाला आलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. ताम्हिणी घाटातील प्रसिद्ध मिल्की बार वॉटरफॉल येथे 450 फूट खोल दरीत कोसळून एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शाहिद अन्सारी (वय 20, रा. चाकण, नाणेकरवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळी एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून चार युवक पर्यटनासाठी ताम्हिणी घाटात आले होते. पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान त्यांच्यापैकी दोघांनी धोकादायक कड्यावरून चढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे गिर्यारोहणाचा कोणताही अनुभव किंवा आवश्यक प्रशिक्षण नव्हते. अशा परिस्थितीत धोकादायक ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न जीवावर बेतला. याचवेळी शाहिद अन्सारी याचा तोल जाऊन तो सुमारे 450 फूट खोल दरीत कोसळला.
घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा शोध घेण्यासाठी एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. खोल दरी, दुर्गम परिसर आणि आव्हानात्मक परिस्थिती अशा अडचणींचा सामना करत बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शाहिदचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.






