दोघेजण जखमी
| चिपळूण | प्रतिनिधी |
कराड-चिपळूण मार्गावरील खेर्डी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातावेळी त्याचक्षणी जाणार्या 12 टायर ट्रकच्या चाकाखाली आलेला एक दुचाकीस्वार तरुण गंभीररित्या जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या जखमी दुचाकीस्वारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. यात अन्य दुचाकीस्वारासह दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात नोंद केली आहे. समीर चंद्रकांत चिवेलकर (33, खेर्डी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तसेच साईराज सावंत, सुनिल पवार अशी जखमी झालेल्याची नावे आहेत.
समीर चिवेलकर हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने शहरातील बहाद्दुरशेख नाक्याहून खेर्डी येथे तर साईराज सावंत व सुनिल पवार हे दोघे दुचाकीने बहाद्दुरशेख नाक्याच्या दिशेने जात होते. तसेच बहाद्दुरशेख नाक्याहून पुढे खेर्डीमार्गे बेळगावच्या दिशेने मालवाहू 12 टायर ट्रक जात होता. या दोन्ही दुचाकी खेर्डी येथे आल्या असताना त्याची समोरासमोर धडक बसली. या अपघातावेळी दुचाकीवरुन कोसळलेल्या समीरचा त्याचक्षणी जाणार्या ट्रकच्या चाकाखाली आला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. अखेर त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी सकाळी समिर याच्यावर खेर्डी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची माहिती पोलीसाना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.