कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना तरुणाचा बुडून मृत्यू

। धाटाव । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील सुतारवाडी भागात कुंडलिका नदीमध्ये सुरू असणारी राफ्टिंग ही दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेच्या कारणामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. शनिवारी (दि. 11) मुंबई येथील मनोज अमर नाथ (26) या तरुणाचा राफ्टिंग करीत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, जर का पर्यटकांना सुरक्षितता मिळत नसेल तर राफ्टिंग बंद करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

कुंडलिका नदीमध्ये साजे, येरळ, धगडवाडी, आंबिवली, कामत येथील नदीपात्रातून गेले पंधरा वर्षे राफ्टिंग व्यवसाय सुरू आहे. पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अगदी जगभरातून या ठिकाणी राफ्टिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. परंतु, गेले काही वर्ष या ठिकाणी अपघाताच्या घटनेत वाढ होताना दिसत आहेत. राफ्टिंग व्यवसायिकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. शनिवार राफ्टिंगचा आनंद घेण्याकरता आलेला मनोज अमर नाथ या तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे राफ्टिंग सारखा धोकादायक व्यवसाय बंद करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे. त्यातच गेली दहा वर्ष हा व्यवसाय एका परप्रांतीय व्यक्तीच्या ताब्यात गेला असल्याने येथील स्थानिक तरुणांना या व्यवसायाचा काही फायदा उरलेला नाही. मात्र, गेली चार-पाच वर्ष स्थानिक तरुण छोटे-मोठे व्यवसायिक यांना कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळत नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version