। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्याच्या ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची सतत वर्दळ असते. सध्या पावसाळ्यामुळे पर्यटकांची पावले सिंहगडाकडे वळली आहेत. मात्र, बुधवारी (दि.20) संध्याकाळी येथे एक धक्कादायक घटना घडली. गौतम गायकवाड नावाचा एक तरुण किल्ल्यावरून बेपत्ता झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तो सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा परिसरात शेवटचा दिसला होता. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. त्यामुळे तो या कड्यावरून घसरून दरीत पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा तानाजी कडा जवळपास 1000 फूट खोल आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज सकाळपासून पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून कसून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस दल, बचाव पथके तसेच जंगल परिसराचा अनुभव असलेले काही स्वयंसेवक मिळून शोधकार्यात सहभागी झाले आहेत. गौतम गायकवाडचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र, तो खोल दरीत कोसळल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी शोधमोहीम अधिक गतीने सुरू केली आहे. या घटनेमुळे सिंहगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेत.







