सहा जणांना अटक
। मुंबई । प्रतिनिधी ।
जुन्या वादातून केलेल्या हल्ल्यात 25 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे तर पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
विलेपार्ले येथील प्रेमनगर परिसरात ही घटना घडली असून मोहम्मद गौस इखलाक पटेल असे मृत तरूणाचे नाव आहे. मृत तरूण व आरोपी एकाच परिसरातील रहिवासी आहेत. मृत तरूण गौस 11 मार्च रोजी परिसरातून जात असताना तीन आरोपींसोबत त्याचा वाद झाला. तेव्हापासून उभयतांमध्ये वारंवार वाद होत होते. आरोपींनी गौसला ठार मारण्याची धमकी ही दिली होती. त्यानंतर आरोपींनी गौसला लाथ्याबुक्यांनी, बांबूने मारहाण केली. तसेच, तिक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात गौस गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी हत्या व दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी अमन उस्मान कुरेशी, सिराज हुसैन सय्यद, उस्मान इब्राहिम कुरेशी, इम्रान इमामसाहेब शेख, पीरमोहम्मद सय्यद हुसैन आणि ताबिश उस्मान कुरेशी यांना अटक केली. तसेच, पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.