| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराने आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून सोमनाथ बोबडे या तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खंडाळे तालुक्यातील एका गावातील विहिरीत फेकून दिला. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू भिसे हा नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असून कळंबोलीतील रोडपाली परिसरात राहतो. सोमनाथ बोबडे हा त्याच्या परिचयाचा होता व सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय भिसेला होता. याच संशयातून त्याने ५ फेब्रुवारी रोजी विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे या मित्रांच्या मदतीने सोमनाथला एका बहाण्याने बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून त्याचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अतिशय थरारक पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने सोमनाथचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर एखाद्या जिवंत माणसासारखा बसवला आणि स्वतः कार चालवत १९१ किलोमीटरचा प्रवास केला. सुखेड गाठल्यानंतर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकला आणि ओळख पटू नये म्हणून तो जाळण्याचा प्रयत्न केला.
खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील एका शेतातील विहिरीत सोमनाथ बोबडे याचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. लोणंद पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. लोणंद पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पुण्याच्या दिशेने जाणारी एक संशयास्पद कार आढळून आली. या कारचा माग काढत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. हवालदार बंडू भिसे याने अटक झाल्यानंतरही गुन्हा कबूल करण्यास टाळाटाळ केली, मात्र त्याच्या साथीदारांनी पोलिसांसमोर सर्व सत्य सांगितले. अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आणि तपासाचे धागेदोरे थेट नवी मुंबई पोलीस दलापर्यंत पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.
