| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या डोंगरात असलेल्या गारबेट येथे रात्रीच्या सुमारास ट्रेकिंग करणाऱ्या दोन पर्यटकांची स्थानिक तरुणांच्या पथकाने कोणत्याही तांत्रिक बाबींचा अभ्यास नसताना सुखरूप सुटका केली. रस्ता भरकटलेल्या दोन तरुणांना रात्री सुखरूप जंगलाच्या बाहेर आणून भिवपुरी रोड स्टेशन येथे सोडले.
माथेरान येथील गारबेट गावात पर्यटक पावसाळी व उन्हाळी ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात. मुंबईवरून येणारे दोन पर्यटक भिवपुरी स्टेशन येथे रात्रीच्या सुमारास उतरले. या दोन्ही पर्यटकांनी ट्रेकिंग करण्यास सुरुवात केली. पाली- भुतिवली धरणावरून सरळ रस्त्याने रात्रीच्या सुमारास सागवाडी आदिवासी वाडीत जाऊन पोहोचले. रात्रीच्या चांदण्यांमध्ये ते आपली ट्रेकिंग करत होते. ते दोघे पोहोचले तेव्हा त्यांना दोन रस्ते दिसले. एक उजव्या बाजूला आणि दुसरा डाव्या बाजूला जाणारा रस्ता होता. या पर्यटकांना गारबेटला जाण्यासाठी उजव्या बाजूच्या रस्त्याने जायचे होते. परंतु, रात्रीच्या अंधारामुळे हे पर्यटक डाव्या बाजूने ट्रेकिंग करीत पुढे जात राहिले. जवळ पास एक तासानंतर हे पर्यटक गारबेटच्या खालच्या बाजूला जाऊन पोहचले. यावेळी त्यांना खालच्या बाजूला एक खोल दरी दिसली. यावेळी हे दोन्ही पर्यटक एका जागेवर स्थिर राहिले आणि थांबून विचार करून 112 नंबरला फोन केला.
यानंतर नेरळ पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ असणाऱ्या संदिप निरगुडे या युवकाला फोन केला. या युवकाने घटनास्थळी धाव घेतली. त्या पर्यटक असणाऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एक तास लागला. हा युवक एक तासानंतर घटनास्थळी पोहोचला तेव्हा या युवकाने धाडस करून रेस्क्यू करण्याचा निणर्य घेतला. पंधरा मिनिटानंतर रेस्क्यू करून दोन्ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. युवकाने दोन्ही पर्यटकांना आपल्या राहत्या घरी सुखरूप आणले. पर्यटकांना या युवकाने चहा व नाश्ता दिला. त्यानंतर स्मिता जैन व अमित कुमार या दोन्ही पर्यटकांना नेरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.







