हिवाळी अधिवेशात मोर्चा काढण्याचा निर्णय
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची रविवारी (दि.2) ऑनलाईन बैठक घेण्यात आली. राज्याध्यक्ष ॲड. बाबुराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आंदोलनाची महत्त्चपूर्ण भूमिका घेतली असून, आगामी हिवाळी अधिवेशात नागपूरमध्ये मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात असणार आहेत.
शासनाकडे असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन गांभीर्याने पाहात नसल्याची भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त करत, शासनाच्या या उदासीन धोरणाबद्दल सर्वच कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात झालेल्या बैठकीत, राज्य शासनाकडे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत. मागण्या मान्य होत नसतील तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद आणि असहकार आंदोलन करावे, तसेच नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढावा. त्याचबरोबर कनिष्ठ सहाय्यक व वरिष्ठ सहाय्यक यांच्या पदोन्नती स्तराबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा.
कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या कामाच्या वाटपाबाबत शासनाने मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करावीत. तसेच, त्यांना -15 ही वेतनश्रेणी लागू करावी. सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यांना वर्ग-2 राजपत्रीत पदाचा दर्जा देण्यात यावा. अनुकंपा तत्त्वावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळाली आहे, त्यांना पूर्वीप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे फेरनियुक्ती देण्यात यावी. जिल्हा परिषदेमध्ये वाहनचालक, शिपाई यांची पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी. कंत्राटी पद्धत रद्द करण्यात यावी. आकृतीबंधामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही विभागातील पदे कमी करण्यात येऊ नयेत. केंद्राप्रमाणे महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ देण्यात यावी. लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत व पदोन्नती परीक्षेबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात याव्यात. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-2 मधील पदोन्नतीचा कोटा 35 टक्के करण्यात यावा. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा. अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे, ते रद्द करण्यात यावे. यासह इतर मागण्यांवर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा. इत्यादी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य करून घेण्यासाठी ठोस आंदोलन करण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक बलराज मगर, सुनील जानोरकर, विजयकुमार हळदे, रामचंद्र मडके,रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, राजेंद्र गायकवाड, कार्याध्यक्ष पराग खोत, सचिव संतोष साळवकर देवेंद्र झेंडेकर, उपाध्यक्ष अंजली वर्तक, खजिनदार मेघा म्हात्रे आदींसह राज्यातील साधारपणे 25हून अधिक जिल्हा परिषदेतील कर्मचारी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
