| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी (दि.13) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात काढण्यात आली. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणानंतर 59 जागांमधील सदस्यपदांचे आरक्षण जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रीया राबविण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार रसाळ आदींसह शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, ॲड. परेश देशमुख व इतर राजकिय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते. दुपारी बारा वाजल्यापासून आरक्षण काढण्यात सुरुवात झाली. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही प्रक्रीया राबविण्यात आली. मयुरा महाडीक आणि कायरा शिंदे या दोन मुलींच्या हस्ते सोडत काढण्यात आली. किशन जावळे यांनी जिल्हा परिषदेच्या 59 जागांमधील सदस्य पदांचे आरक्षण जाहीर केले. त्यामध्ये अनुसूचित जाती एक, अनुसचित जमाती पाच, नागरिकांचा मागास प्रवर्ग आठ आणि सर्वसाधारण 16 अशा एकूण 30 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पनवेल तालुक्यातील पाली देवद जिल्हा परिषद मतदार संघामध्ये अनुसूचित जाती महिला. पेण तालुक्यातील जिते, कर्जत तालुक्यातील मोठे वेणगांव, कशेळे, चौक, श्रीवर्धनमधील बोर्लीपंचतन मतदार संघामध्ये अनुसूचित जमाती महिला. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण आठ जागांसाठी आहे. त्यामध्ये रोहा तालुक्यातील आंबेवाडी, घोसाळे, पनवेल तालुक्यातील वावंजे, वावेघर, महाडमधील बिरवाडी, पेणमधील खरवली, तळा तालुक्यातील रहाटाड, अलिबागमधील चेंढरे मतदार संघासमावेश आहे. सर्वसाधारण महिलांसाठी पनवेल तालुक्यातील आत्कारगांव, माणगाव तालुक्यातील माणगांव तर्फे वरेडी, पनवेल तालुक्यातील आत्करगांव, उरण तालुक्यातील चाणजे, माणगाव तालुक्यातील तळाशेत, पेण तालुक्यातील शिहू, सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा, तळा तालुक्यातील चरई खुर्द, उरणमधील नवघर, कर्जतमधील नेरळ, पळस्पे, मुरूड तालुक्यातील कोर्लई, अलिबाग तालुक्यातील आंबेपूर, थळ, पनवेलमधील वडघर आणि श्रीवर्धनमधील आराठी असे 16 जागांवर आरक्षण पडल्याचे जाहिर करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील 30 जागांवर महिलाराज असणार आहे. उर्वरित 29 जागांवर पुरुषांचा राज असणार आहे.
त्यामध्ये सुधागडमधील राबगांव, पेणमधील महालमिऱ्या डोंगर, पनवेलमधील नेरे, कर्जतमधील कळंब आणि माणगांवमधील गोरेगाव या पाच मतदार संघात अनुसूचित जमाती आरक्षण जाहिर केले आहे. उरणमधील जसई, चिरनेर, पनवेलमधील केळवणे, कर्जतमधील कडाव, अलिबागमधील कावीर, महाडमधील दासगांव, पोलादपूरमधील कापडे बुर्दूक या सात मतदार संघातील आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच खालापूरमधील सावरोली, वासांबे, पेणमधील दादर, वडखळ, अलिबागमधील शहापूर, आवास, चौल, रोहामधील नागोठणे, भुवनेश्वर, माणगावमधील निजामपूर, मोर्बा, म्हसळामधील पाभरे, पांगळोली, महाडमधील नाडगांव तर्फे बिरवाडी, करंजाडी, पोलादपूरमधील लोहारे आणि मुरूडमधील राजपूरी असे 17 मतदार संघासाठी सर्वसाधारण आरक्षण काढण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेवर महिलाराज 59 जागांपैकी 30 जागांवर महिला तर 29 जागांवर पुरुषांचे राज असणार आहे. या सोडतीमध्ये अनेकांच्या इच्छेला ब्रेक लागला. तर अनेकांची इच्छा पुर्ण झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे काहींची हिरमोड झाली, तर काहींनी आनंद व्यक्त केला. आरक्षणावर हरकती नोंदविण्यासाठी 17 ऑक्टोबरपर्यंत संधी देण्यात आली आहे. तहसील कार्यालयांसह जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती नोंदवू शकता असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.







