झुगरेवाडी शाळेचा राष्ट्रीय स्तरावर बोलबाला

एनसीईआरटी कार्यशाळेसाठी रवी काजळेंची निवड; ठाकूर-कातकरी बोलीभाषेतील लोकगीताची जबाबदारी

| नेरळ | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या झुगरे वाडीतील राजिप प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेच्या शिरपेचात पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्र राज्यातील आदिम जनजातींच्या बोलीभाषेतील लोकगीते, बालगीते आणि बडबडगीतांचे संकलन व पुस्तकनिर्मिती या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमासाठी झुगरे वाडी शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदची राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच भोपाळ-मध्यप्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती. आदिम बोलीभाषांच्या जतनासाठी राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या महाराष्ट्रातील ठाकूर आणि कातकरी या आदिम जनजातींच्या बोलीभाषा, त्यांची समृद्ध मौखिक परंपरा, लोकसंस्कृती, लोकगीते, बालगीते आणि बडबडगीते यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. काळाच्या ओघात अनेक आदिम बोलीभाषा लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. या भाषांमधील पारंपरिक ज्ञान, लोकसाहित्य, संस्कृती आणि मौखिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या व्यापक उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान, भोपाळ येथे झालेल्या या कार्यशाळेत कर्जत तालुक्यातील झुगरेवाडी शाळेने पुन्हा एकदा राष्ट्रीय शैक्षणिक व्यासपीठावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना रवी काजळे यांनी ठाकूर आणि कातकरी बोलीभाषेतील विविध लोकगीते, बालगीते आणि पारंपरिक बडबड गीतांच्या संकलन आणि लेखन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला.विशेष म्हणजे, त्यांच्या यापूर्वी प्रकाशित झालेल्या ठाकरी भाषेतील पुस्तकातील निवडक बालगीतांचाही या राष्ट्रीय पुस्तकनिर्मिती उपक्रमात समावेश करण्यात येणार आहे.

आदिवासी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे, शिक्षण आनंददायी आणि कृतीशील बनविणे आणि शाळेला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनविणे यासाठी त्यांनी सातत्याने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या मातृभाषेचा सन्मान, स्थानिक संस्कृतीची ओळख आणि परिसरातील लोकपरंपरांचा शिक्षणाशी संबंध जोडण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे. त्यामुळे झुगरेवाडी शाळा ही केवळ शिक्षण देणारी शाळा न राहता स्थानिक संस्कृती, लोकसाहित्य आणि शैक्षणिक नवोपक्रम यांचा सुंदर संगम बनली आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील शाळाही आपल्या कल्पकतेच्या, गुणवत्तेच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवू शकतात, हे या यशाने सिद्ध केले आहे.

बोली भाषेतून शिक्षण
झुगरेवाडी गावातील स्थानिक लोकपरंपरा, बोलीभाषा आणि शालेय गीतांनाही राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळणार आहे. शाळेच्या स्वतःच्या गीतांचाही या पुस्तकात समावेश होणार असल्याने झुगरे वाडी शाळेच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर नोंद होणे ही अत्यंत अभिमानाची बाब ठरणार आहे.
ग्रामस्थांचा सहभाग
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ शिक्षक किंवा तज्ज्ञांपुरते मर्यादित न राहता स्थानिक समाजातील ज्येष्ठ व्यक्ती, महिला आणि लोकपरंपरेचे जाणकार यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे.
Exit mobile version