दोन वर्षात वन्यप्राण्यांची गणनाच नाही
महाड | प्रतिनिधी |
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत वन्यप्राण्यांची गणनाच झालेली नाही. यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे होणारी प्राणीगणना न झाल्यामुळे प्राण्यांची अद्ययावत माहिती आणि गणना वनविभागाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये पसरल्यामुळे सर्वत्र हाहाकार निर्माण झालेला असून, सर्वच क्षेत्रांमध्ये उदासीनता निर्माण झालेली आहे. या महामारीचा गंभीर परिणाम मानवी जीवनावर झाला असताना, प्राणीमात्रांवरदेखील त्याचा गंभीर परिणाम झालेला दिसून येतो. महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा परिणाम ज्या प्रकारे अन्य कामकाजावर झालेला आहे, त्याचप्रमाणे प्राणी मात्रांच्या गणनेवर झालेला आहे.
गेल्या दोन वर्षात गणनाच झालेली नसल्याने कोकणासह संपूर्ण राज्यातील प्राण्याची अद्ययावत माहिती वनविभागाकडे उपलब्ध झालेली नाही. रायगड जिल्ह्यामध्ये दरवर्षी प्रत्येक तालुक्यातील प्राण्याची गणना केली जाते. ही गणना प्रत्येक जंगलामध्ये जाऊन पाहणी केल्यानंतर करण्यात येते. त्याचबरोबर स्थानिक नागरिक शेतकर्यांकडून देखील वन्यप्राण्यांची माहिती संकलित केली जाते. परंतु, गेल्या दोन वर्षात गणना करण्यात आलेली नसल्याने प्राण्याची सविस्तर माहिती सध्या तरी उपलब्ध नाही.
मागील दोन वर्षांत फणसाड अरण्यातील प्राण्यांची गणना कोरोनामुळे करता आली नाही. पावसाळा सुरु झाल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण जीवनमान बदलून गेले आहे. अत्यंत अडचणीचा काळ असला तरी प्राण्यांची गणना होणे आवश्यक आहे.
राजू भोसले, प्राणी मित्र
महाड तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्येही वन्यप्राण्याची गणना करण्यात आलेली नाही. भविष्यात परिस्थिती नियंत्रणात येताच शासनाच्या आदेशावरुन प्राण्यांची गणना करण्यात येईल.
प्रशांत शिंदे, वनाधिकारी, महाड