26 जानेवारीचा उपक्रम न राबवल्यास कारवाई होणार
| रायगड | खास प्रतिनिधी |
26 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजानिक सुट्टी दिली जाते. महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला असून या कालावधीत सर्व शाळांनी विविध उपक्रम राबवण्याचे आदेश सरकारने एका परिपत्रकाव्दारे दिले आहेत. ज्या शैक्षणिक संस्था हा आदेश धुडकावून लावतील त्यांच्यावर संबंधीत शिक्षण विभाग कारवाई करणार आहे.
विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्ती पर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे यावर्षीपासून महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार नाही. याऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि स्पर्धांना उपस्थित राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी 26 जानेवारीला रविवार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये प्राथमिक (2528) आणि माध्यामिक (600) विभागाच्या मिळून 3128 शाळा आहेत, तर विद्यार्थ्यांची संख्या सुमारे साडेसहा लाखांच्या आसपास आहे. यासर्व शाळांना सदरचा उपक्रम राबवण्याच्या सूचना संबंधित विभागाकडून देण्यात आल्या आहेत. हे परिपत्रक जारी करण्याच्या आधीपासून काही शाळा असे उपक्रम राबवत आले आहेत. त्यामध्ये नवीन काही नाही. मात्र अन्य शाळा या पासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मात्र आता या परिपत्रकातील आदेशाचे पालन करावे लागणार आहे. ज्या शैक्षणिक संस्था शालेय विभागाच्या परिपत्रकाला प्रतिसाद देणार नाहीत. त्यांची माहिती स्थानिक पातळीवरील गट शिक्षण अधिकार्यांच्यामार्फत गोळा केली जाणार आहे. त्यानतंर संबंधीतांना कोणती शिक्षा द्यायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
26 जानेवारीच्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास, आपली महान संस्कृती आणि देशाचे भविष्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे. त्यामुळे 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमांच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांसह साजरा केला जाईल,’’ असे परिपत्रकात नमूद केलं आहे.
ज्या शैक्षणिक संस्था आदेशाचा भंग करतील. त्याची माहिती शालेय शिक्षण विभागाला कळवण्यात येणार आहे. परिस्थितीनुसार त्यांच्यावर काय कारवाई करायची आहे, हे मार्गदर्शन घेऊन ठरवण्यात येईल.
– पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक