कारवाई करूनदेखील अतिक्रमण क्षेत्र हटविण्यास यंत्रणा उदासीन
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
वनाचे क्षेत्र वाढविण्याबरोबरच त्याचे संवर्धन करण्यासाठी वन विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु, काही मंडळी याच वनाच्या क्षेत्रातील काही जागांमध्ये हातभट्टी तयार करणे, शेड बांधणे, कुंपण घालणे, असे प्रकार करून अतिक्रमण करीत आहेत. अलिबाग तालुक्यातील 12 हेक्टर क्षेत्राला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. 40 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, कारवाई करूनही अतिक्रमण हटविण्यास यंत्रणा उदासीन ठरत असल्याचे चित्र आहे.
अलिबाग तालुक्यात वनाचे 12 हजार हेक्टर क्षेत्र आहे. वनसंपदा टिकून ठेवण्याबरोबरच तेथील वन्यप्राण्यांचा अधिवास कायम राहावा यासाठीदेखील वन विभागाकडून प्रयत्न केला जातात. वणव्याबरोबरच वन विभागातील काही अधिकार्यांच्या दुर्लक्षपणामुळे वनाच्या जागेत खुलेआमपणे अतिक्रमण करून ती जागा बळकाविण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात. त्याच जागेमध्ये कुंपण करणे, तेथील साग व इतर झाडांची तोड करून आपली जागा असल्याचा दावा अतिक्रमण करणारे करीत असतात. स्थानिक वन अधिकारी व कर्मचार्यांच्या पाठबळाशिवाय हे होऊ शकत नाही, असे ही बोलले जात आहे.
वनाच्या संवर्धन व संरक्षणासाठी या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांची लागवड केली जाते. परंतु, या रोपांचे संवर्धन होत नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. लाखो रुपये खर्च करून रोपांची लागवड करूनही त्या रोपांना वाढविण्यास वन विभाग उदासीन ठरल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. पशु, पक्षीप्रेमींनी याबाबत अनेकवेळा नाराजीही व्यक्त केली आहे.
वाढत्या अतिक्रमणामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास संकटात सापडलेला असताना वनाचे क्षेत्र घटण्याची भीतीही निर्माण झाली आहे. याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कार्यवाही सुरू असल्याचा वनखात्याचा दावा आहे. परंतु, कारवाई करूनही त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण कसे होते, असाही प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
वनक्षेत्रात होणारे अतिक्रमण ही बाब खूप गंभीर आहे. कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. अलिबाग तालुक्यात 12 हेक्टर क्षेत्रात अतिक्रमण झाले आहे. वन विभागाने अनेकवेळा कारवाईदेखील केली आहे. 40 जणांविरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. परंतु, तालुक्यात अतिक्रमणाची परिस्थिती जैसे थे अशीच असल्याचे चित्र आहे. याकडे वन अधिकारी गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अलिबाग तालुक्यातील एकूण वन क्षेत्रापैकी 12 हेक्टर क्षेत्रामध्ये अतिक्रमण झाले आहे. अंदाजे 40 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेही दाखल झाले आहे. नवीन अतिक्रमण दिसून येत नाही. जे अतिक्रमण झाले आहे, ते जुने आहे. मात्र, अतिक्रमण रोखण्याचा विभागाकडून प्रयत्न केला जाईल. संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.
– नरेंद्र पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, अलिबाग