मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवला आहे, रोजची कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढतेच आहे. आजपर्यंत मुरुड तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1565 च्या वर गेली आहे.तसेच मृत व्यक्तींची संख्या 75 पर्यंत झाली आहे.
तहसीलदार गमन गावित,पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे तसेच नगरपालिका प्रशासन कायद्याचा बडगा दाखवून दंडात्मक कारवाईने आपल्या परीने कोरोनाच्या दुसर्या लाटेचे संक्रमण रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.परंतु तालुक्यातील सर्व नागरिकांना सर्व प्रकारच्या कामांसाठी मुरुड शहराकडे यावे लागते तसेच बाजारपेठेतील दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असल्याने सकाळच्या वेळी बाजारात गर्दी होते.12 जून पासून दंडात्मक कारवाईमध्ये बदल करण्यात आला असून तो अधिक कडक करण्यात आला असून लग्न समारंभ , प्रेतयात्रा यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.वारंवार सूचना देऊनही रस्त्यात थुंकणार्यांचे प्रमाण कमी होत नाही ,कोरोनाचे संक्रमण वाढण्यामागे हे पण महत्वाचे कारण आहे , कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मुरुड नगरपरिषदेतर्फे रस्त्यात व गर्दीच्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइडचे फवारे मारण्यास जोमाने सुरवात झाली आहे.लवकरच मुरुड शहर कोरोना मुक्त करू अशी ग्वाही नगराध्यक्ष स्नेहा पाटील , उपनगराध्यक्ष नौसीन दरोगे यांनी दिली आहे