| दिल्ली | वृत्तसंस्था | शमी-बुमराहच्या विक्रमी फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर टीम इंडियाने क्रिकेटच्या पंढरीत विजयी जल्लोष साजरा केला. दुसर्या कसोटी सामन्यातील 151 धावांच्या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 272 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमान इंग्लंडचा संघाचा दुसरा डाव 120 धावांत आटोपला. मोहम्मद सिराजने जेम्स अँडरसनला क्लीन बोल्ड करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. इंग्लंडच्या दुसर्या डावात कर्णधार ज्यो रुटनं 60 चेंडूत 5 चौकाराच्या मदतीने केलेली 33 धावांची खेळी सर्वोच्च ठरली. जोस बटलरच्या 25 धावा आणि मोई अलीच्या 13 धावा वगळता अन्य एकाही इंग्लिश क्रिकेटरला दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून मोहम्मद सिराजने पहिल्या डावाप्रमाणेच दुसर्या डावातही सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जसप्रित बुमराहच्या 3, ईशांत शर्मा 2 आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.
इंग्लंडच्या दुसर्या डावाची सुरुवात खराब झाली. बॅटिंगमध्ये धमाका दाखवणार्या बुमराहने पहिल्याच षटकात इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याच्यापाठोपाठ शमीने दुसर्या षटकात टीम इंडियाला दुसरे यश मिळवून देत इंग्लंडला अडचणीत आणले. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद होण्याची नामुष्की इंग्लंडवर ओढावली. इशांत शर्माने हसीब हमीदच्या रुपात इंग्लंडला तिसरा धक्का दिला. चहापानापूर्वी जॉनी बेयरस्टोच्या रुपात इशांतने टीम इंडियाला आणखी एक यश मिळवून दिले. बुमराहने कर्णधार ज्यो रुटला बाद करत भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला.
शमी-बुमराहची रेकॉर्डब्रेक भागीदारी
लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या अखेरच्या फलंदाजांनी कमाल केली आहे. ज्यांच्या खांद्यावर टीम इंडियाच्या गोलंदाजीची धुरा आहे, त्यांनी फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला अक्षरक्ष: रडवलं. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी 39 वर्षांपूर्वीचा लॉर्ड्सवरील रेकॉर्ड मोडीत काढला आहे. बुमराह आणि शमी दोघांनी लंचब्रेकपर्यंत 91 धावांची नाबाद भागीदारी केली. या दोघांनी 66 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करताच हा रेकॉर्डब्रेक केला आहे. भारताकडून लॉर्ड्सवर मदन लाल आणि कपिल देव यांनी 1982 मध्ये 9 व्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली होती.
लॉर्ड्सवर तिसरा विजय
भारताचा लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवरील हा तिसरा कसोटी विजय ठरला आहे. याआधी भारताने 2014 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव केला होता. तर, या क्रिकेटच्या पंढरीतला पहिला वहिला ऐतिहासिक विजय हा कपिल देव यांनी आपल्या कॅपटन्सीत मिळवून दिला होता. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला होता.