कामगारांना जनावरांपेक्षाही भयानक वागणूक
। पेण । वार्ताहर ।
पेण एसटी आगारातील कार्यशाळेची दुरवस्था झाली असल्याने येथे कार्यरत असणार्या कामगारांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. या कार्यशाळेतील दुर्गंधीयुक्त, अस्वच्छ परिसर आणि कामगारांना दिल्या जाणार्या अपुर्या सोयीसुविधांमुळे कामगारांचे आरोग्य आले असून वरिष्ठ अधिकार्यांना या परिस्थितीची माहिती असून देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
पेण एसटी आगारातील कार्यशाळेच्या पत्र्याचे शेड जुने झाले असून त्यातील काही पत्रे फुटले असल्याने पावसाचे पाणी खाली पडते आणि या साचलेल्या पावसाच्या पाण्यात बसूनच या कामगारांना गाड्यांची दुरुस्ती करावी लागत आहे. त्याचप्रमाणे या आगारातील ऑफिसमधील कर्मचार्यांना देखील पाण्यातच खुर्ची आणि टेबल मांडून काम करावे लागत आहे. या कामगारांची व्यथा इथेच संपत नाही तर या आगारातील शौचालय आणि मुतारीची देखील फारच दयनीय अवस्था झाली असून शौचालयाची टाकी फुटली असून तेथील मलमुत्र पाण्यात पाण्यात मिसळून या ठिकाणी दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील कामगारांचे आरोग्य रामभरोसे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पेण एसटी आगारातील कार्यशाळेचे बांधकाम हे फार जुने असून रामवाडी येथे नवीन कार्यशाळा बांधण्यात येत आहे. या कार्यशाळेचे बांधकाम पूर्ण होताच पेणच्या कार्यशाळेचे स्थलांतर या ठिकाणी करण्यात येणार आहे. तरी कामगारांना पाण्याचा त्रास होऊ नये याकरिता लवकरात लवकर या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न आमच्या विभागाकडून केला जात आहे.
अनघा बारटक्के – विभागीय वरिष्ठ अधिकारी, रामवाडी, पेण