विधानसभेमध्ये सलग ५५ वर्ष दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या एका पर्वाचा अस्त, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते मा.आमदार गणपतराव उर्फ आबा देशमुख यांचे निधन
| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गणपतराव देशमुखांनी वयाची 96 वर्षे पूर्ण केली. इतके वय असूनही ते आतापर्यंत मतदारसंघात फिरत होते. जनसामान्यांचे प्रश्न तडीस लावून नेत होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु होते.
आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली. 1962 ते 1995 पर्यंत ते सलग आमदार म्हणून निवडून आले होते.
रोजगार हमी मंत्री असताना गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबासारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकर्यांना प्रोत्साहान दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची डाळिंब उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण झाली. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाटा वाटा होता. देशातील महिलांसाठीची पहिली सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली.